कामा रुग्णालयात जेनेटिक समुपदेशन केंद्र
बुधवारपासून सेवा कार्यान्वित होणार, विशेष मुलांच्या पालकांसाठी ठरणार उपयुक्त
मुंबई, ता. २६ : कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात १ एप्रिलपासून जेनेटिक (आनुवंशिक) विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. या विभागाच्या माध्यमातून आनुवंशिक आजारांचे निदान, समुपदेशन आणि व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या विभागाची जबाबदारी डॉ. शबाना बोराटे आणि डॉ. क्षमता किंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांना अचूक तपासणी व योग्य उपचार मिळणार आहेत.
या उपक्रमामुळे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आनुवंशिक विकारांचे लवकर निदान करणे शक्य होणार असून, नवजात बालकांमधील आजारांची वेळेत ओळख करून उपचार देणे अधिक सुलभ होईल. तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशनही उपलब्ध होणार आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.