खरात प्रकरणाची
नवी मुंबईतही पुनरावृत्ती
वैज्ञानिकाच्या नावाने महिलांचे लैंगिक शोषण
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असताना, नवी मुंबईतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ‘इस्रो’मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत उच्चशिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आदर्श म्हात्रे (वय २१) असे आरोपीचे नाव असून, विविध नावांचा वापर करून, त्याने डझनभर महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे.
अवघ्या दहावी पास असलेल्या म्हात्रेने लग्न जुळवणाऱ्या नामांकित संकेतस्थळांवर बनावट खाती तयार केली. कधी ‘इस्रो’चा वैज्ञानिक, कधी प्रशासकीय अधिकारी असल्याची बतावणी करायचा. उच्चभ्रू राहणीमान दाखवत, डॉक्टर, इंजिनिअर, बँक अधिकारी असलेल्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, नंतर पैशांची गरज दाखवत लाखो रुपये उकळणे, ही त्याची कार्यपद्धती होती. एका महिलेकडून लुबाडलेले पैसे दुसऱ्या महिलांसाठी वापरत होता. उर्वरित पैशांवर तो मौजमजा करायचा. त्याने केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा विविध शहरांतील महिलांना जाळ्यात ओढले. आतापर्यंत त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाले आहेत.
----
१२ नावांनी फसवणूक
पोलिस तपासात आदर्श म्हात्रेने स्वप्नील वारूळे, हेमंत गायकर, नहुश म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी टोपणनावे वापरल्याचे आढळून आले आहे. तो अत्यंत चलाखीने आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा. नाशिकचा अशोक खरात ज्योतिषीच्या नावाने महिलांची फसवणूक करायचा, अगदी त्याच धर्तीवर ‘वैज्ञानिका’च्या नावाने त्याने अनेक महिलांच्या आयुष्याशी खेळ केला.
---
महिलांनी लग्न जुळवणाऱ्या संकेस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.