म्हाडाच्या २,६४० घरांसाठी लाॅटरी
आजपासून भरता येणार अर्ज; १५ मे रोजी सोडत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेली म्हाडाच्या मुंबईतील घरांची लाॅटरी अखेर जाहीर झाली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल २,६४० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार इच्छुकांना उद्या सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, आलेल्या पात्र अर्जांची १५ मे रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
म्हाडाने मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लाॅटरीत कन्नमवारनगर-विक्रोळी, पत्रा चाळ सिद्धार्थनगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाषनगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्यनगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा इत्यादी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २,६४० घरांचा समावेश आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठीचा गो लाइव्ह कार्यक्रम म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हस्ते उद्या सोमवारी पार पडणार आहे. त्यानंतर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ३ वाजल्यापासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या सोडतीची सविस्तर जाहिरात सोमवारी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, सदनिका सोडत प्रक्रियेबाबत माहिती देणारी पुस्तिका त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २९ एप्रिलला रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती ३० एप्रिलला रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- आरटीजीएस/एनईएफटीद्वारे ३० एप्रिलपर्यंत अनामत रकमेचा भरणा करता येईल
- प्राप्त अर्जाची प्रारूप यादी ५ मे रोजी दुपारी वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल
- ऑनलाइन दावे व हरकती दाखल करण्यासाठी ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ मे रोजी दुपारी ३ वाजता प्रसिद्ध होईल
- १५ मे रोजी सकाळी ऑनलाइन सोडत काढली जाईल
कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे
- अत्यल्प उत्पन्न गट - १४५
- अल्प उत्पन्न गट - ८५८
- मध्यम उत्पन्न गट - १,४०८
- उच्च उत्पन्न गट - २२९
विखुरलेल्या घरांचा समावेश
म्हाडाच्या या सोडतीत बांधकाम सुरू असलेल्या १,७६२ सदनिकांचा समावेश आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकसकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकसकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिकांसह अन्य विखुरलेल्या घरांचा समावेश आहे.
अद्ययावत ॲप
लाॅटरीत सहभागी होण्याकरिता ‘आयएसएलएमएल २.०’ ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर अनुक्रमे गुगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरदेखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्पन्न मर्यादा
- अत्यल्प उत्पन्न गट - ६ लाख रुपये
- अल्प उत्पन्न गट - ९ लाख रुपये
- मध्यम उत्पन्न गट - १२ लाख रुपये
- उच्च उत्पन्न गट - १२ लाखाहून अधिक
...
‘अत्यल्प’ हे ‘अल्प’साठी पात्र
म्हाडाच्या लॉटरीसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.