जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरणी मैत्रिणीच्या निर्दोषत्वाला आव्हान
लवकरच सुनावणी अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : खार येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजाच्या हत्या प्रकरणातील सहआरोपी आणि तिची मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष मुक्ततेला जान्हवीच्या आईने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
निधी कुकरेजा यांनी ॲड. त्रिवनकुमार करनानी यांच्यामार्फत केलेल्या अपिलानुसार, पडळकरची निर्दोष मुक्तता ही खटल्यादरम्यान रेकॉर्डवर आलेल्या पुराव्यांविरोधात जाणारी असून केवळ निराधार आणि अतार्किक गृहीतकांवर आधारित असल्याचे म्हटले आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी खार येथील ‘भगवती हाइट्स’ इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित पार्टीदरम्यान जान्हवी कुकरेजा या महाविद्यालयीन तरुणीच्या खुनाप्रकरणी सत्र न्यायालयाने तिचा मित्र श्री जोगधनकरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच वेळी जान्हवीची मैत्रीण दिया पाडळकरची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती.
सरकारी पक्षाने गुन्ह्याच्या ठिकाणी पडळकरची उपस्थिती सिद्ध केली असली तरीही गुन्ह्याच्या कृत्यात तिचा सहभाग संशयास्पद वाटतो; कारण तिच्या ओठावर झालेल्या एका जखमेव्यतिरिक्त, तिच्या शरीरावर इतरत्र कोणतीही जखम आढळली नसल्याचे न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता करताना म्हटले होते. हाच धागा धरून गुन्ह्याच्या ठिकाणी पडळकरची उपस्थिती आणि तिच्या व मृत जान्हवीमध्ये झालेली झटापटही कनिष्ठ न्यायालयाने मान्य केली होती; परंतु अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमध्ये तिचा सक्रिय सहभाग आणि समान उद्देश असल्याचे सिद्ध करणारे पुरेसे परिस्थितीजन्य आणि न्यायवैद्यक पुरावे पूर्णपणे दुर्लक्षित करून न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केल्याचे अपिलात म्हटले आहे.
...
हल्ल्याशी थेट संबंध!
पडळकरचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग वाजवी संशयापलीकडे सिद्ध करणाऱ्या अनेक साक्षी-पुराव्यांचाही विचार न्यायालयाने केला नसल्याचे अपिलात म्हटले आहे. याप्रकरणी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि पडळकरच्या वस्तू सापडल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय पडळकर ज्या उशीवर आणि चादरीवर झोपली होती, त्यावर मृत जान्हवीचे रक्त आढळल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाले आहे; ज्यामुळे पडळकरचा या हल्ल्याशी थेट संबंध असल्याचेही अपिलात प्रामुख्यात नमूद केले आहे.