खालापूरमध्ये पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात १९.३८ लाखांची तरतूद
पाताळगंगा नदीवर भिस्त; टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या कमी
खालापूर, ता. ३१ (बातमीदार) : दरवर्षी पाणीटंचाईच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या खालापूर तालुक्यासाठी यंदा काहीसा दिलासा देणारे चित्र दिसत आहे. संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाईसाठी तयार करण्यात आलेल्या २०२५-२६च्या कृती आराखड्यात केवळ १३ गावे आणि ३१ वाड्यांचा समावेश असून, यासाठी १९ लाख ३८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत निधी आणि टंचाईग्रस्त भागांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येते.
उन्हाळ्यात तालुक्यातील काही भागांत पाणीटंचाई जाणवते. यामध्ये नवीन विंधन विहीर दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे, खोल करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत. टेंभरी ग्रामपंचायत हद्दीत सारंगवाडी येथे विंधन विहीर विशेष दुरुस्ती आणि टेंभरी पाडा येथे विहीर खोल करून गाळ काढणे यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. १३ गावे आणि ३१ वाड्यांसाठी मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
चौकट
टंचाईत घटीचा आलेख
खालापूर तालुका सातत्याने टंचाईग्रस्त यादीत होता. २०१६-१७ आणि २०१७-१८मध्ये ३० गावे आणि ४० वाड्या अशा ७० ठिकाणी टंचाई होती. २०१८-१९ व २०१९-२०मध्ये २७ गावे आणि ३९ वाड्या नोंदल्या गेल्या. २०२०-२१मध्येही हीच स्थिती कायम होती. मात्र २०२१-२२मध्ये १७ गावे आणि ३० वाड्या, २०२२-२३मध्ये १९ गावे आणि ३१ वाड्या, तर २०२३-२४मध्ये १७ गावे आणि २८ वाड्या अशी घट झाली. २०२४-२५ आणि २०२५-२६मध्ये ही संख्या १३ गावे आणि सुमारे २८-३१ वाड्यांपर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे २०२०-२१मध्ये सुमारे ७१ लाखांची तरतूद असताना यंदा ती १९ लाखांवर आली आहे.
कोट
१ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पहिला टप्पा, १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २६ दुसरा टप्पा आणि १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ असा तिसरा टप्पा आहे. तीन टप्प्यांत संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. सध्या तळवली दांडवाडी येथे टँकरची मागणी ग्रामस्थांनी केली असून, आठवडाभरात त्या ठिकाणी टँकर सुरू होईल.
- लहू ढोले,
पाणीपुरवठा विभाग, खालापूर पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.