सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : जिल्ह्यातील सर्वांत जुनी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ठाणे महापालिकेचा विकास कासवगतीने होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. गेल्या दहा वर्षांत नवी मुंबई महापालिकेने साडेचार हजार कोटींची झेप घेतली आहे. तर ठाणे महापालिका मात्र अपेक्षित वेगाने झेप घेऊ शकली नाही. पालिकेला केवळ तीन हजार ४०० कोटींची झेप घेता आल्याचे त्यांनी नमूद केले.
२०१६-१७ मध्ये नवी मुंबई महापालिकेकडून एक हजार ९७५.८४ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. यंदा हाच अर्थसंकल्प सहा हजार ७०४.८३ कोटींचा आहे. २०१६-१७ मध्ये दोन हजार ८०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सहा हजार २२१ कोटींचा आहे. म्हणजेच, गेल्या दहा वर्षांत नवी मुंबईने चार हजार ७२८.४९ कोटी, तर ठाणे पालिकेने तीन हजार ४२१ कोटींची झेप घेतली आहे. सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्यांनी ठाण्याचा विकास साधलाच नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ठाणे पालिकेनंतर तब्बल १० वर्षांनी स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेला एवढी झेप घेता येत असेल, तर ठाणे पालिकेचे हे अपयश नाही का?, असा सवाल प्रधान यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर साडेतीन दिवस पालिकेची महासभा घेत त्यावर चर्चा झाली. कधी नव्हे ते नवख्या नगरसेवकांनीही अर्थसंकल्पावर चांगले भाषण केले. शहरातील विविध समस्यांवर नगरसेवकांनी भाष्य केले आहे. या सर्व सूचनांचा समावेश सुधारित अर्थसंकल्पात करण्यात आला पाहिजे. मात्र, ते शक्य होणार आहे का, यावर पालिका महापौर आणि आयुक्तांनी भाष्य करावे, असे आवाहनही प्रधान यांनी केले.
................................
धरणाचे काय करणार?
ठाणे महापालिकेनंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेकडून धरण विकसित करण्यात आले. ठाणे महापालिकेकडून अर्थसंकल्पात साधी तरतूदही केलेली नाही. यावर आमच्या सर्वच नगरसेवकांनी सूचना केल्या आहेत. सध्या पालिकेत सत्तेवर असलेले लोकच राज्यातही सत्तेवर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारकडून धरण मंजूर करून आणावे, अशी सूचनाही मनोज प्रधान यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.