पनवेल, ता. १ (बातमीदार) : शेअर्स ट्रेडिंगमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी तीन व्यक्तींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश कुर्मी हे नवीन पनवेलमधील सेक्टर सहा येथे राहत असून, त्यांनी टेलिग्राम ॲपमध्ये जाहिरात लिंक पाहिली. या वेळी शेअर मार्केटमध्ये भरघोस नफा देण्याबाबत दर्शविण्यात आले होते. त्यांनी लिंकवर क्लिक केले असता ते व्हाॅट्सअप ग्रुपला जॉईन झाले. या ग्रुपवर नफ्याबाबत माहिती दिली जात होती. राकेश यांनी ५० हजार रुपये सुरक्षा ठेव जमा केली आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक केल्याने त्यांना नफा होत होता. त्यामुळे त्यांनी अधिक पैशांचे गुंतवणूक केली आणि शेअर्स विकत घेतले. त्यांनी एक कोटी ५० हजार रुपये भरल्यानंतर वेगवेगळे आयपीओंचे पर्याय देण्यात आले आणि नवीन आयपीओंचे समभाग विकत घेतल्यानंतरच त्यांच्या खात्यात रक्कम देण्यात येत होती. त्यांची रक्कम अगोदर घेतलेला आयपीओमध्ये गुंतून राहिल्याने त्यांनी ती मिळण्यासाठी विनंती केली. नवीन आयपीओसाठी आणखी ९० लाख रुपये भरण्यास सांगितले, मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ते भरण्यास नकार दिला आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.