तुर्भे, ता. २ (बातमीदार) : संकटमोचन, बलोपासना आणि बुद्धीची देवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या हनुमान जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरात गुरुवारी (ता. २) भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘संकटमोचन हनुमान की जय’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शहरातील अनेक हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण, स्तोत्र पठण, महाआरती, महारुद्र अभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुर्भे गावात तुर्भे ग्रामदेवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री हनुमान जन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे ६ वाजून ३४ मिनिटांच्या मुहूर्तावर जन्मोत्सव सोहळा पार पडला. यानंतर सकाळी १० वाजता ग्रामस्थांच्या सहभागातून सामूहिक श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. त्यानंतर आळंदी येथील कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे कीर्तन झाले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ५ वाजता शांता महिला हरिपाठ मंडळाचा हरिपाठ पार पडला. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली, जी उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली. फुलांनी सजविलेली पालखी आणि भक्तांच्या जयघोषांनी परिसरात भक्तिरस ओसंडून वाहत होता. नवी मुंबईत हनुमान जयंती उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरी झाली.
पहाटेपासून कार्यक्रमांचे आयाेजन
सीबीडी परिसरातील अलबेला हनुमान मंदिरातही पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मकाळ सोहळा, सुंठवडा वाटप, हनुमान स्तोत्र पठण अशा कार्यक्रमांत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाविकांनी हनुमान यांना रुईचा हार, पंचामृत व तेल अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली.
राम नवमीची सांगता
बेलापूर गावात राम नवमी उत्सवाची सांगता हनुमान जयंतीने करण्यात आली. आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सीवूड्स, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या भागांतही मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
परंपरा जपण्याचा प्रयत्न
घणसोली गावात देवस्थान संस्थेच्या वतीने हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. नेरूळ गावातील हनुमान मंदिरात १८३२ पासून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. कोपरखैरणे येथील हनुमान मंदिरात मागील १५० वर्षांपासून जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
कोपरखैरणेमध्ये विविध कार्यक्रम
कोपरखैरणे गावात ग्रामविकास ग्रामस्थ मंडळाच्या वतीने भजन, हरिपाठ, कीर्तन, श्रीरामरक्षा पठण, गीतरामायण सादरीकरण, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त जागरण व दिवसभर धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. पालखी मिरवणुकीदरम्यान श्री हनुमान प्रासादिक हरिपाठ, तसेच विठ्ठल-रखुमाई हरिपाठ मंडळाच्या सुश्राव्य भजनांनी वातावरण भक्तिमय झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.