ठाणे विभागाला नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा
७० नव्या बस अद्याप कागदावरच; जत्रांच्या हंगामात प्रवाशांचे हाल
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्ट्यांसोबतच गावोगावी जत्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. अशा काळात ठाणे विभागातील एसटी आगारांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे; मात्र एसटी महामंडळाकडे गाड्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिवहन मंत्रालयाकडून ठाणे विभागासाठी जाहीर करण्यात आलेल्या ७० नव्या ‘लालपरी’ बस अद्याप ताफ्यात दाखल न झाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडत आहे.
ठाणे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण आठ आगार आहेत. या आगारांतून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि जत्रांमुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरी गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवासाची मोठी फरपट होत असल्याचे चित्र आहे. ठाणे विभागाच्या ताफ्यात सध्या असलेल्या अनेक गाड्या जुन्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धोकादायक बनल्या आहेत.
१५० गाड्यांचे आश्वासन
प्रवाशांची वाढती संख्या आणि जुन्या गाड्यांची दुरवस्था लक्षात घेता, परिवहन मंत्रालयाने ठाणे विभागासाठी १५० नव्या गाड्या देण्याची घोषणा केली होती; मात्र गेल्या वर्षभरात यातील केवळ ८० गाड्या विभागाला मिळाल्या आहेत. उर्वरित ७० गाड्यांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. सध्या उपलब्ध असलेल्या नव्या लालपरी बसवर लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा प्रचंड ताण येत असून, त्या विश्रांतीविना धावत आहेत. परिणामी, गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
खासगी प्रवासाचा भुर्दंड
राज्य सरकारने महिलांना ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय केली आहे; मात्र आगारात वेळेवर एसटी उपलब्ध नसल्याने या सवलतींचा लाभ घेण्याऐवजी प्रवाशांना नाईलाजास्तव अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खासगी ट्रॅव्हल्स किंवा वडापचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
भाविकांचे हाल
राज्यातील अनेक देवस्थानांच्या जत्रांसाठी दरवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात; मात्र यंदा गाड्यांच्या कमतरतेमुळे पुरेशा जादा गाड्या सोडणे महामंडळाला शक्य झालेले नाही. त्यामुळे जत्रेला जाणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १५ एप्रिलपासून गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.