ठाण्यात कचरा डबे गायब
कचराकुंडीमुक्त शहर मोहिमेचा बोजवारा; काँग्रेसची चौकशीसह प्रत्यक्ष पाहणीची मागणी
ठाणे, ता. २ : ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात अनेक ठिकाणी केवळ लोखंडी स्टँड उभे असून, डबे मात्र चोरीला गेले आहेत किंवा अडगळीत पडले आहेत. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
ठाणे महापालिकेने ‘कचरामुक्त ठाणे३ संकल्पनेंतर्गत स्मार्ट सिटी, आमदार आणि खासदार निधीतून शहराच्या विविध भागांत, पदपथांवर आकर्षक स्टीलचे कचरा डबे बसवले होते. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे आणि चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळे हे डबे आता उखडून रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्यात पडल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी या डब्यांची अवस्था ‘थुकदाणी’सारखी झाली असून, मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर तोफ डागली आहे. "मागील पाच वर्षांत या डब्यांवर नेमका किती खर्च झाला? त्यांची गुणवत्ता काय होती? आणि प्रत्यक्षात ते सध्या कुठे आहेत? याचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सार्वजनिक करावा," अशी मागणी पिंगळे यांनी केली आहे. तसेच, शहरातील सर्व कचरा डब्यांचे तातडीने ''फिजिकल ऑडिट'' करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
शहरात ठिकठिकाणी पडलेले डबे तातडीने गोळा करून ते योग्य ठिकाणी पुन्हा बसवावेत आणि या प्रक्रियेत निष्काळजी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन
प्रशासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील रस्त्यांवर पडून असलेले सर्व निकामी कचरा डबे गोळा करून ते महापालिका मुख्यालयासमोर टाकले जातील आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.