गॅस सिलिंडर ग्राहकांचा रास्ता रोको
पनवेल-सायन मार्गावर वाहतूक ठप्प
चेंबूर, ता. ५ (बातमीदार) ः चेंबूर येथील भारत गॅस सिलिंडर वितरण कार्यालयातून गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी शनिवारी पनवेल-सायन मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांना ताटकळत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावामुळे इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा परिणाम गॅस वितरणावरही होत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, ग्राहकांना सिलिंडरसाठी वणवण भटकावे लागत आहे.
याशिवाय, चेंबूर येथील भारत गॅस वितरण कार्यालयातील संगणक प्रणालीही गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद होती. त्यामुळे कार्यालय काही काळ बंद ठेवण्यात आले होते.
शनिवारी सिलिंडर मिळेल, या अपेक्षेने सकाळपासून ग्राहकांनी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; मात्र आजही सिलिंडर उपलब्ध नसल्याने कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर झाला. अखेर संतप्त ग्राहकांनी पनवेल-सायन मार्गावर रास्ता रोको करीत आंदोलन छेडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, गॅस वितरण तातडीने सुरळीत करावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत असून प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.