द्वेषाने द्वेष संपत नाही!
धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. ‘द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो’ हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेल्फेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. परिषदेला खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, तसेच विविध देशांतून आलेले भिक्खू, भन्ते रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतीप्रिय थेरो, तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते. जगातील वाढत्या युद्धपरिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला. ‘द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो’ हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ असा संदेश त्यांनी दिला. भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी बुद्धांनी दाखवलेला मार्गच मानवतेला तारणारा असल्याचे सांगितले. बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारात शोधले पाहिजे, असेही ते म्हणाले.
ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, की सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा (नालासोपारा) येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
धम्म परिषद ही धम्म चळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचे सांगत त्यांनी आयोजक भन्ते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे, असे ते म्हणाले. या परिषदेत शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.