छत्रपती शिवरायांचा पद्मदुर्ग जेट्टीच्या प्रतीक्षेत
ऐतिहासिक वारसा पडझडीच्या उंबरठ्यावर
मुरूड, ता. ६ (बातमीदार) ः मुरूडच्या अरबी समुद्रात सिद्दीच्या जंजिऱ्याला शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला पद्मदुर्ग आज दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत आहे. या किल्ल्याची तटबंदी ढासळत असून, तोफांनाही गंज लागला आहे. तसेच, या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना आणि शिवभक्तांना जीव धोक्यात घालून होडीतून जावे लागते. यामुळे जंजिऱ्याच्या धर्तीवर येथेही आधुनिक जेट्टी उभारून किल्ल्याचे संवर्धन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुरूडच्या समुद्रातील अपराजित जंजिरा किल्ल्याचा प्रमुख सरदार सिद्दी याचा मुकाबला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चार किलोमीटर अंतरावरील कासा खडकावर दर्यासारंग दौलत खानच्या देखरेखीखाली १६६१ मध्ये उभारलेला कासा अर्थात पद्मदुर्ग किल्ला मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराची साक्ष देतो. मात्र, सध्या हा किल्ला अखेरची घटका मोजत आहे. समुद्राच्या लाटांनी किल्ल्यांच्या तटबंदींची पडझड सुरू असून, अवस्था बिकट झाली आहे, तर तोफांनाही गंज लागला आहे. याबाबत मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था तसेच पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या किल्ल्याला उर्जितावस्था मिळण्यासाठी डागडुजी व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बी. जी. येलीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अद्याप पुरातत्त्व विभागात निधी आलेला नाही; निधी मिळाल्यानंतर कामाला त्वरित सुरुवात केली जाईल.
जीव धोक्यात घालून प्रवास
मुरूडवरून पद्मदुर्गकडे जाण्यासाठी छोट्या बोटीमधून जावे लागते. भरती-ओहोटीच्या गणितामुळे मोठ्या बोटी तिथे लागू शकत नाहीत. यामुळे पर्यटकांची संख्या मर्यादित राहते. सरासरी ५ ते ६ लाख देश-विदेशातील पर्यटक जंजिऱ्यावर भेट देतात. अद्ययावत जेट्टी बांधल्यास पद्मदुर्गकडेदेखील पर्यटकांचा ओघ वाढेल आणि स्थानिक बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ठोस उपाययोजनांची गरज
किल्ल्याच्या संवर्धनासंदर्भात मागील वर्षी खासदार सुनील तटकरे यांनी पुरातत्त्व विभाग व मेरिटाइम बोर्डच्या उच्च पदस्थांसोबत संयुक्त पाहणी केली होती, तर मध्यंतरी पर्यटन विभागाच्या एक-दोन बैठकादेखील झाल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्षात पद्मदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शिवरायांचा पद्मदुर्ग वंचित का?
जंजिरा किल्ल्यासाठी ९९ कोटी खर्चूनही जेट्टीचे काम उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेट्टीची प्रतीक्षा का करावी लागते. महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन करावे, अशी सरकारची भूमिका असताना शिवरायांचा पद्मदुर्ग वंचित का, असा सवाल रायगड स्मारक समितीचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी केला.
पद्मदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त आहे. या किल्ल्यावर जेट्टी झाल्यास मोठ्या प्रमाणावर शिवभक्त आणि पर्यटकांना किल्ल्यावर जाणे सोपे होईल. पर्यायाने स्थानिक मच्छीमारांना व व्यावसायिकांना शाश्वत रोजगार मिळेल.
- संजय ठाकूर, गड व दुर्गप्रेमी, नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.