कोंडीने बदलापूर ठप्प
५०० मीटर अंतरासाठी तासभर प्रतीक्षा; बोगदे आणि सावरकर उड्डाणपुलावर रांगा
बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : मुंबईचे उपनगर म्हणून वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरात सध्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वाहतूक कोंडीने गुदमरलेली पाहायला मिळत आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी बदलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडणारे सर्व महत्त्वाचे मार्ग वाहनांच्या महाजाळात अडकले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, रेल्वेखालील बोगदे आणि बस डेपो परिसरात निर्माण होणाऱ्या भीषण कोंडीमुळे नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.
बदलापूर पूर्वेला पश्चिमेला जोडण्यासाठी मुख्यत्वे सावरकर उड्डाणपुलाचा वापर केला जातो; मात्र शनिवार-रविवारच्या सुट्टीत या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पुलाखालून दुचाकी आणि रिक्षांसाठी असलेला बोगदा आणि बेलवली परिसरातील बोगदा ही दोन्ही ठिकाणे बॉटलनेक ठरत आहेत. सायंकाळच्या वेळी परिस्थिती इतकी गंभीर होते, की अवघ्या ५०० मीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना चक्क ३० ते ६० मिनिटे खर्ची घालावी लागत आहेत. यामुळे कामावरून घरी परतणारे नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बदलापूरमधील रस्ते मुळातच अरुंद असताना, त्यावर दोन्ही बाजूंनी बसलेले अनधिकृत फेरीवाले आणि दुकानदारांनी केलेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बस डेपो परिसरात रिक्षांची बेशिस्त पार्किंग आणि खासगी वाहनांच्या अनधिकृत थांब्यामुळे मुख्य रस्त्याचा अर्धा भाग व्यापला जातो. प्रशासनाकडून या फेरीवाल्यांवर आणि अतिक्रमणधारकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रस्त्यांची क्षमता कागदावरच राहिली आहे.
कुलूपबंद पोलिस चौक्या
एकीकडे शहराची लोकसंख्या लाखांच्या घरात पोहोचली असताना वाहतूक पोलिसांचे नियोजन मात्र अत्यंत तोकडे पडत आहे. अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिस गायब असतात, तर काही ठिकाणी वाहतूक पोलिस चौक्यांना चक्क कुलूप लावलेले आढळते. गर्दीच्या वेळी मोजकेच पोलिस रस्त्यावर असतात, जे वाढत्या वाहनसंख्येला नियंत्रित करण्यास असमर्थ ठरत आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने राँग साइडने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडत आहे.
पर्यायी रस्त्यांची गरज
वाढत्या नागरीकरणानुसार बदलापूरमध्ये तातडीने पर्यायी रस्ते विकसित करण्याची गरज आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अंतर्गत भागात नवीन छोटे उड्डाणपूल उभारणे आणि बोगद्यांची क्षमता वाढवणे हे उपाय आता अनिवार्य झाले आहेत; मात्र नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
कोंडीची ठिकाणे आणि कारणे
सावरकर उड्डाणपूल : पुलावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने संथ वाहतूक
बोगदे (बेलवली व स्टेशन परिसर) : अरुंद बोगद्यांमुळे दुचाकी आणि रिक्षांची कोंडी
अतिक्रमणाचा विळखा : मुख्य रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले, बेकायदा पार्किंग आणि दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
बेशिस्त वाहनचालक : वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.