भिवंडी उपमहापौरांच्या सदस्यपदावर टांगती तलवार
ओबीसी दाखला बनावट असल्याचा आरोप
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेचे उपमहापौर तारिक बारी मोमिन यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्रावर माजी नगरसेवक इस्माईल रंगरेज यांनी आक्षेप घेतला आहे. मोमिन यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचा दावा करत रंगरेज यांनी कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. वारंवार सुनावणी होऊनही ठोस पुरावे सादर न केल्यास उपमहापौरांच्या सदस्यपदावर टांगती तलवार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे नगरसेवक तारिक बारी मोमिन हे ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गातून निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी ‘मोमिन’ जातीचा दाखला जोडला होता; मात्र तक्रारदार इस्माईल रंगरेज यांचा दावा आहे की, तारिक मोमिन यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कोणत्याही जुन्या शासकीय दस्तऐवजात ‘मोमिन’ या आडनावाचा उल्लेख नाही.
२५ पुराव्यांसह तक्रार दाखल
रंगरेज यांनी आपल्या तक्रारीसोबत उत्तर प्रदेशातील मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि जमीन महसूल विभागाचे सुमारे २५ पुरावे जोडले आहेत. तारिक मोमिन यांनी सादर केलेला त्यांच्या वडिलांचा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील जातीचा दाखलाही बोगस असल्याचा आरोप केला आहे.
१९६७ चा पुरावा सादर करण्यात अपयश
नियमानुसार, जात पडताळणीसाठी महाराष्ट्रातील १९६७ पूर्वीचा रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक असते. निवडून आल्यानंतर तीन महिन्यांत तीन सुनावण्या होऊनही उपमहापौरांनी असा कोणताही ठोस पुरावा समितीसमोर सादर केलेला नाही. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ओबीसी दाखल्याचा वापर करून शैक्षणिक लाभ घेतले असले, तरी तारिक मोमिन यांनी महत्त्वाचे पुरावे का जोडले नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.