लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटनांत वाढ
रेल्वे ट्रॅकवर सुरक्षा गस्त वाढवण्याची मागणी
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उपनगरी लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटनांत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळी मस्जिद रेल्वे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षा गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे विशेषत महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित ट्रेन ही सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल होती आणि त्या वेळी प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष राजा सोनटक्के यांनी रेल्वे ट्रॅक परिसरात सुरक्षा दलांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवासादरम्यान उपस्थित असलेल्या काही महिला प्रवाशांनी सांगितले की, ही घटना गर्दीच्या वेळेत घडली असती, तर परिणाम गंभीर झाले असते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रेल्वे ट्रॅक परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. महिला प्रवासी संघटनांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून, सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत ही तिसरी घटना असून, यापूर्वी ठाकुर्ली रेल्वे स्थानक कल्याण जंक्शन दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर, तसेच परळ ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या बदलापूर सीएसएमटी जलद लोकलमध्ये ही दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.