खारघर, ता. ९ (बातमीदार) : सरकारची अधिकृत मान्यता न घेता सुरू असलेल्या तळोजा वसाहत फेज एक व दोनमधील अनधिकृत शाळांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित शाळांनी सात दिवसांच्या आत शाळा बंद न केल्यास इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी संस्थाचालकांना पत्राद्वारे दिला आहे.
तळोजा परिसरातील ओशियन ब्राईट स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल, कलसेकर इंग्लिश स्कूल, द वेस्ट हिल्स इंटरनॅशनल स्कूल, अर्कम इंग्लिश स्कूल आदी शाळा आवश्यक शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पनवेल महापालिका आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शाळांची पाहणी केली. त्या वेळी सरकारची मान्यता न घेता शिक्षण सुरू असल्याचे निदर्शनास आले. गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांच्या सूचनेनुसार, काही दिवसापूर्वी केंद्रप्रमुखांनी या शाळांसमोर अनधिकृततेचे फलक लावून पालकांना आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नयेत, असे आवाहन केले होते; मात्र शाळा प्रशासनाने हे फलक तत्काळ हटविल्याची माहिती समोर आली आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी उपोषणाचा इशारा देत पालिका शिक्षण विभागाकडे निवेदन दिले. त्यानंतर शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी संबंधित संस्थाचालक व मुख्याध्यापकांना नोटीस बजावत स्पष्ट इशारा दिला आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय कोणतीही शाळा सुरू करता येत नाही. सात दिवसांत शाळा बंद न केल्यास वीज व पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. त्यास सर्वस्वी संस्थाचालक जबाबदार राहतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शाळांची लवकरच पाहणी
पनवेल महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि मी स्वतः येत्या दोन दिवसांत तळोजा परिसरातील शाळांची पाहणी करणार आहोत. अनधिकृत शाळांबाबत पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल. पालकांनी अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.