किनाऱ्यांवर बोटींचा मुक्काम
वातावरणातील बदल, इंधन दरवाढीचा फटका
महेंद्र पवार ः सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ९ ः डहाणू तालुक्यात वातावरणातील अनियमित बदल आणि इंधन दरवाढीमुळे माशांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या संकटाने मच्छीमार व्यवसायावर गंभीर परिणाम झाला असून, अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. कधी थंडी, तर कधी कडक उन्हामुळे समुद्रातील परिस्थिती बदलली आहे. या बदलांचा थेट परिणाम हा माशांच्या संख्येवर झाला आहे. समुद्रात दूरवर जाऊनही मासे मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी तसेच उंबरगाव परिसरातील अनेक बोटी किनाऱ्यावरच उभ्या आहेत. खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नाही. तसेच इंधन खर्च वाढल्याने मासेमारी करणे परवडत नसल्याचे मच्छीमार सुनील पारधी यांनी सांगितले.
-------------------------------
बाजारपेठा ओस
इंधन दरवाढीमुळे खर्च वाढलेला असताना, माशांच्या अभावामुळे मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. खोल समुद्रात जाऊन रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने अनेकांनी मासेमारीसाठी जाणे टाळले आहे. यामुळे संपूर्ण साखळीवर परिणाम झाला आहे. डहाणूत मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध नसल्याने बाजारपेठा ओस पडल्या असून, केवळ कमी प्रमाणात लहान मासेच विक्रीस येत आहेत.
----------------------------------
ग्राहकांना आर्थिक फटका
पापलेट, दाढा, घोळ, सरंगासारखे मोठे मासे विक्रीस येत होते. मात्र, सध्या लहान पापलेट, मांदेली, कोळंबी आदी माशांवरच बाजार अवलंबून आहे, तर काही मच्छीमार गुजरातच्या उंबरगाव, वापी येथून मासे खरेदी करून स्थानिक बाजारात विक्री करत आहेत. मात्र, त्याचे भाव जास्त असल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.
-------------------------------
आर्थिक संकट
अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. बोटींवरील खलाशी, मासे वाहतूक करणारे तसेच गावोगावी टोपलीतून मासे विकणारे छोटे विक्रेत्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असतो. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मासेमारी ठप्प असल्याने सर्वच घटकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
--------------------------
अनेक दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने बोटी समुद्रात जात नाहीत. उदरनिर्वाहासाठी आम्हाला गुजरातमधून मासे आणून विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भावही वाढले आहेत.
- अभय पागधरे, मच्छीमार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.