भिवंडी मेट्रो जानेवारी २०२७ मध्ये धावणार
३,७७१ कोटींच्या विकास आराखड्यालाही गती
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : ठाणे ते भिवंडी यादरम्यान मेट्रो-५ (ऑरेंज लाइन) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण होतील. त्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते, असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला. भिवंडी महापालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.९) शहरात संयुक्त पाहणी दौरा केला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शहरातील वाहतूक नियोजन आणि मेट्रो प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अंजूरफाटा ते धामणकर नाका यादरम्यान सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
बैठकीत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा आराखडा सादर केला. विविध टप्प्यांतील विकासकामांसाठी ३,७७१ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, त्याचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो मार्गाखालील रस्त्यांचे रुंदीकरण आणि कल्याण रोड परिसरातील प्रलंबित कामांना यामुळे आता गती मिळणार आहे.
उत्पन्नाच्या स्रोतावर भर
शहरात मेट्रो येणार हे आनंदाचे असले तरी, मेट्रो परिसरातील स्वच्छतेची पूर्ण जबाबदारी मेट्रो प्रशासनाने उचलावी, अशी आग्रही मागणी महापौर नारायण चौधरी यांनी केली. मेट्रो खांबांवरील जाहिरात फलकांच्या माध्यमातून महापालिकेला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळवता येईल का, यावर आयुक्त अनमोल सागर यांनी चर्चा केली.
भिवंडी-कल्याण टप्प्याचा पेच कायम
ठाणे ते भिवंडी कामाची प्रगती समाधानकारक असली तरी, भिवंडी ते कल्याण दरम्यानचा मार्ग ''अंडरग्राउंड'' (खालून) असणार की ''एलिव्हेटेड'' (वरून), याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा तांत्रिक निर्णय झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील कामाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.