शिक्षकांसाठी ‘रस्ता सुरक्षा’ कार्यशाळा
ठाण्यातील १२० शाळांमध्ये उपक्रम; शिस्तबद्ध पिढी घडवण्यासाठी वाहतूक विभागाचा पुढाकार
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) : वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पोलिस आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २० एप्रिलदरम्यान ‘रस्ता सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन’ शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे विभागातील सुमारे १२० शाळांमधून प्रत्येक शाळेचा किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या शिबिरात केवळ वाहतूक नियमच नव्हे, तर मैदानी परेड, वाहतूक नियमन, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार आणि अग्निशमन या विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणासाठी नोंदणी फी अनिवार्य असून, गणवेश व आवश्यक साहित्य शिक्षकांना स्व-खर्चाने घ्यावे लागणार आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणारा हा उपक्रम शहराच्या वाहतूक संस्कृतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर भर
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षकांना प्रशिक्षित करून, त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी रुजवणे हा आहे. प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उपयोग भविष्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह, स्थानिक सण-उत्सव आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी केला जाणार आहे.
शालेय जीवनातच रस्ता सुरक्षेचे संस्कार झाल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना केवळ नियमच समजणार नाहीत, तर आपत्कालीन स्थितीत इतरांना मदत करण्याचे कौशल्यही विकसित होईल.
- पंकज शिरसाट, पोलिस उपआयुक्त (वाहतूक विभाग).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.