धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण सुरू
पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक वृक्ष आणि फांद्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा वृक्षांची आणि फांद्यांची छाटणी करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेच्या ताफ्यात हायड्रॉलिक एरियल लिफ्ट असलेली पाच वाहने दाखल झाली आहेत.
पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडतात, ज्यामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच झाडांच्या फांद्या आणि विद्युत तारा यांचा संपर्क होऊन अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून संभाव्य धोके ओळखले जात आहेत. उन्हाळ्यात झाडांची सावली नागरिकांना मिळावी आणि झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी, यासाठी मे महिन्याच्या मध्यापासून छाटणीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदा बोलेरो पिकअप वाहनांवर बसवलेल्या दुहेरी स्विंग आर्म यंत्रणेच्या १० मीटर उंचीपर्यंत कार्यरत हायड्रॉलिक एरियल लिफ्टचा वापर केला जाणार आहे. ही यंत्रणा पारंपरिक शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून, उंच वृक्षांच्या फांद्यांची जलद आणि सुरक्षित छाटणी करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांत ठाण्यात वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१७ मध्ये पाचपाखाडी येथे झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच मागील वर्षी ७ मे रोजी रिक्षावर झाड कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, सर्वेक्षण सुरू असतानाच रस्त्यावर झुकलेल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे काम वृक्ष प्राधिकरण विभागाने सुरू केले आहे.
नियोजित वेळेपूर्वीच सर्वेक्षणाला सुरुवात
दरवर्षीप्रमाणे मे आणि जून महिन्यात वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. यंदा होणारी टीका लक्षात घेऊन महापालिकेने नियोजित वेळेपूर्वीच सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस थांबे तसेच रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची पाहणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.