मुंबई

सुदेश भोसले

CD

आशाताईंचं ममत्व ः सुदेश भोसले

आशाताई या केवळ भारताच्या स्वरसम्राज्ञी नव्हे, तर त्या एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. आमच्या नात्याची सुरुवात एका विलक्षण योगायोगाने झाली. १९८६ची ही गोष्ट, एका स्टेज शोमध्ये आशाताईंनी मला पहिल्यांदा परफॉर्म करताना पाहिलं. त्या कार्यक्रमात श्रोत्यांनी मला भरभरून दाद दिली होती आणि आशाताई स्वतः तिथे उपस्थित होत्या. तेथे त्यांनी मला पाहिलं. काही दिवसांनंतर एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने मी त्यांना भेटायला गेलो. मला पाहताच त्या म्हणाल्या, ‘‘त्या दिवशी तू सचिनदा (एस. डी. बर्मन) यांचा आवाज खूप छान काढला होतास.’’ त्यांनी मला ते गाणं पुन्हा गाऊन दाखवायला सांगितलं. आशाताईंसमोर गाणं सादर करणं म्हणजे कोणत्याही गायकासाठी एक पर्वणीच असते; पण मी मात्र प्रचंड घाबरलो होतो. भीतीपोटी मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि कसं बसं ते गाणं गायलो. गाणं संपल्यावर जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा पाहिलं की, आशाताईंनी आश्चर्याने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला होता. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, ‘‘अरे, मला क्षणभर वाटलं की चक्क सचिनदाच माझ्यासमोर गात आहेत!’’ मला काय बोलावं तेच सुचेना. त्यानंतर आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं आणि पंचमदा (आर. डी. बर्मन) यांना ऐकवलं. ते गाणं ऐकून पंचमदा इतके खूश झाले की, त्यांनी मला घरी बोलावलं. तिथे गेल्यावर ते गंमतीने म्हणाले, "मेरे बाप की आवाज निकालते हो!’’ आणि तिथे बसलेले सगळे जण हसायला लागले. पंचमदा पुढे म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांचे दात पडलेले असल्यामुळे त्यांच्या आवाजात जो एक शिटीसारखा विशिष्ट आवाज यायचा, तो तू अगदी अचूक पकडला आहेस.’’ त्यानंतर पंचमदा यांनी त्यांच्या एका मोठ्या शोसाठी मला विचारलं, ज्यात ते स्वतः आणि आशाताई गाणार होत्या. त्या शोमध्ये माझ्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळाला होता. पंचमदा विंगेत उभे होते. त्यांनी येऊन मला आनंदाने घट्ट मिठी मारली. तो आमच्यासाठी एक भावनिक क्षण होता. मुंबईला परतल्यावर त्यांनी मला मोठा ब्रेक दिला आणि त्यानंतर त्यांच्या प्रत्येक शोसाठी त्यांनी माझी निवड कायम ठेवली. अनेक दिग्गज गायक उपलब्ध असूनही आशाताई नेहमी मलाच का निवडतात, असा प्रश्न मला एकदा पडला. मी त्यांना विचारलं, ‘‘ताई, तुम्ही नेहमी मलाच का संधी देता?’’ त्यावर त्यांनी फक्त एक गोड स्मितहास्य केलं आणि म्हणाल्या, ‘‘सुदेश, तू गातोस तर छानच, पण माणूस म्हणूनही तू खूप चांगला आहेस.’’ तेव्हा मला जाणीव झाली की, त्या केवळ माझ्या गायनाच्या प्रेमात नव्हत्या, तर त्या माझी एका आईसारखी काळजी घेत होत्या. आमचे कौटुंबिक संबंध इतके घट्ट होते की, त्या कधीही फोन करून माझी विचारपूस करायच्या. कधी म्हणायच्या, ‘‘जेवायला काय केलंय? मी येतेय तुझ्या घरी जेवायला.’’ एकदा फोनवर बोलताना त्यांना माझ्या आवाजावरून जाणवलं की, मी चिंतेत आहे. मी घर बांधत असल्यामुळे थोडा तणावाखाली होतो, हे कळताच त्या म्हणाल्या, ‘‘मी उद्याच तुझ्या घरी येते.’’ येताना त्यांनी माझ्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपतीची एक सुंदर मूर्ती आणली आणि म्हणाल्या, ‘‘तुला काय भेट देऊ असा विचार करत होते. मग वाटलं ही मूर्तीच घेऊन जावी. आता तुझ्या घरात सुख-शांती येईल आणि सगळं टेन्शन दूर होईल.’’ माझ्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रत्येक विधीला त्या उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, माझ्या साखरपुड्याला त्या चक्क पुण्याला सेकंड क्लास डब्यातून प्रवास करून आल्या होत्या. माझ्या आई-वडिलांच्या निधनावेळी माझ्या घरी पोहोचणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. एकदा एका शोदरम्यान मी विंगेत छातीवर हात ठेवून उभा होतो. आशाताईंनी ते पाहिलं आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या पत्नीला फोन करून सांगितलं की, ‘‘मी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये सुदेशसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्याची पूर्ण बॉडी चेकअप करून घे.’’ इतकी आपुलकी आणि प्रेम त्यांनी मला दिलं. आशाताईंच्या आयुष्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अफाट यश आणि संपत्ती मिळवली; पण वैयक्तिक आयुष्यात खूप दुःख सोसलं. लहानपणी वडिलांचे छत्र हरपलं, लग्नानंतर संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची दोन मुलं गेली, पण इतकं सगळं सोसूनही त्या कधी खचल्या नाहीत. कामाप्रती त्यांची निष्ठा कधीच कमी झाली नाही. जेव्हा-जेव्हा आम्हाला जीवनात त्रास व्हायचा, तेव्हा-तेव्हा आम्ही आशाताईंकडे पाहायचो आणि पुन्हा नव्या जिद्दीने कामाला लागायचो. लतादीदी, आशा ताई, किशोर कुमार, रफी साहेब, पंचमदा, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही सर्व माणसं म्हणजे ‘दैवी शक्ती’ होती. अशी पिढी पुन्हा होणे नाही. मला सार्थ अभिमान आहे की, ही दिग्गज मंडळी आपल्या देशात जन्मली आणि मला आशाताईंसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेकदा लोकांनी त्यांना माझ्याऐवजी दुसऱ्या गायकांची नावे सुचवली, पण त्यांनी मला कधीच डावललं नाही. एकदा काही कारणास्तव मी त्यांच्या शोमध्ये नव्हतो, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘सुदेश नाहीये तर मी द्वंद्वगीत गाणार नाही, मी फक्त माझी सोलो गाणी गाऊन निघून जाईन.’’ आशाताई जेव्हा आमच्या घरी यायच्या, तेव्हा कधीच फिल्मी गप्पा नसायच्या. त्या आमच्या कुटुंबातल्याच एक होऊन गप्पा मारायच्या. एकदा विमानातून प्रवास करताना त्या माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, ‘‘सुदेश, तू गोव्याचा ना? तुझी कुलदेवी कोणती?’’ मी म्हणालो, ‘‘कामाक्षी.’’ तेव्हा त्या हसून म्हणाल्या, ‘‘तुला माहीत आहे का, माझं पाळण्यातलं नाव सुद्धा ‘कामाक्षी’च आहे.’’ ही गोष्ट जगाला माहीत नव्हती. गाण्यासोबतच आशाताई उत्तम सुगरणही होत्या. त्यांच्या घरी गेल्यावर त्या कधीच कोणाला उपाशी पाठवत नव्हत्या. एकीकडे गाण्याचा सराव चालू असतानाच त्या किचनमध्ये जाऊन मटणखिमा परतून यायच्या आणि आम्हा १५-२० लोकांना तृप्त जेवू घालायच्या. त्यांच्याकडून मी एकच गोष्ट शिकलो, ती म्हणजे कितीही मोठे व्हा, पण मेहनत आणि रियाज कधीच सोडू नका. आशाताई काळाप्रमाणे बदलत गेल्या. त्यांनी नव्या पिढीच्या संगीताला आत्मसात केलं, म्हणूनच आजची पिढी जुन्या गायकांना कदाचित विसरली असेल, पण आशाताईंना मात्र प्रत्येक जण ओळखतो. गेल्या महिन्यात जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्या अत्यंत सकारात्मक होत्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘सुदेश, ८ सप्टेंबर तारीख डायरीत लिहून ठेव, माझा वाढदिवस आहे आणि आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे!’’ ही ऊर्जा आणि हा उत्साह त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. त्या खऱ्या अर्थाने माझ्यासाठी त्या ‘आई’ होत्या. गाॅडमदर होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT