जव्हारच्या विकासाला गती
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता. १३) मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रलंबित व अत्यावश्यक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीत तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आल्याची माहिती संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांनी दिली.
यामध्ये विशेषतः १३२ केव्ही सबस्टेशन तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. हे सबस्टेशन सुरू झाल्यास जव्हारसह परिसरातील वारंवार उद्भवणारी वीज समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, शेती, लघुउद्योग व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था व स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास पोलिसांची कार्यक्षमता वाढून नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग १६० ए संदर्भातही स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला.
महामार्गासाठी जमिनीचे संपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय तालुक्याच्या विकासासाठी रस्ते दुरुस्ती व नव्या रस्त्यांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या योजना, आरोग्य सुविधा बळकटीकरण, आदिवासी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे तसेच युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुकणे यांनी सांगितले.