न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजनेसाठी आढावा बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांचे अडथळे दूर करण्याचे निर्देश
उलवे, ता. १९ (बातमीदार) : पनवेल शहर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना-टप्पा ३ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १७) पनवेल महापालिकेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. या वेळी ही योजना प्राधान्याने आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याने ही योजना प्राधान्याने व वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत वाढत्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. या समस्यांच्या पार्श्वभूमीवर न्हावा-शेवा योजनेची अंमलबजावणी गतिमान करण्यावर भर देण्यात आला. या योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याच्या कामात येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करण्यासाठी नगरसेवकांवर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी जमीन उपलब्ध नसणे, काही ठिकाणी जमीन संपादन प्रलंबित असणे तसेच स्थानिक जमीनमालकांकडून कामास विरोध होणे अशा अडथळ्यांमुळे कामात विलंब होत असल्याचे समोर आले. यावर उपाय म्हणून प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले.
दरम्यान, ही योजना एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे पूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, सध्याच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर कामाला आणखी एक महिना वाढण्याची शक्यता असून, जुलै अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या बैठकीस महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, असे विविध मान्यवर अधिकारी उपस्थित होते. प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.