पाली येथे दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. अपूर्व भट यांच्या प्रयत्नांतून पालीतील महिलेस जीवनदान; १० पट वाढलेली प्लीहा काढण्यात यश
रोहा, ता. १९ (बातमीदार) : हेमोलिटिक ॲनिमिया या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पाली (सुधागड) येथील एका आदिवासी महिलेवर रोहा येथील डॉ. अपूर्व भट आणि त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला नवजीवन दिले. या आजारामुळे संबंधित महिलेची प्लीहा (स्प्लीन) नैसर्गिक आकारापेक्षा तब्बल १० पट वाढली होती. सतत रक्ताची कमतरता निर्माण होत असल्याने तिला वारंवार रक्त चढवावे लागत होते. यामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती.
तपासणीत महिलेची प्लीहा सुमारे २५ ते ३० सेंटीमीटर लांबीची आणि सुमारे १.५ किलो वजनाची असल्याचे निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या आकाराची प्लीहा काढणे ही अत्यंत जटिल प्रक्रिया मानली जाते. कारण ती आसपासच्या अवयवांवर दाब टाकते आणि रक्तवाहिन्या अतिशय नाजूक होतात. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्रावाचा धोका वाढतो. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुंबईतील मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे शक्य नव्हते.
अशा परिस्थितीत नातेवाइकांनी रोहा येथील डॉ. अपूर्व भट यांच्याकडे धाव घेतली. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण करून चार बॅग रक्ताची तयारी ठेवण्यात आली. सुमारे तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे महिलेची मोठी प्लीहा यशस्वीरीत्या काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर केवळ तीन दिवसांत रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून, तिला विश्रांतीचा सल्ला देत घरी सोडण्यात आले.
ही शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय यश नसून, ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे. कमी खर्चात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.
चौकट
जटिल शस्त्रक्रियेचे आव्हान
१० पट वाढलेली प्लीहा काढणे ही अत्यंत धोकादायक प्रक्रिया मानली जाते. रक्तस्त्रावाचा मोठा धोका आणि आसपासच्या अवयवांवर येणारा दाब यामुळे शस्त्रक्रिया अधिक कठीण बनते. मात्र योग्य नियोजन, रक्ताची तयारी आणि अनुभवी टीमच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
गरीब रुग्णांना दिलासा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या शहरांतील महागड्या उपचारांचा पर्याय उपलब्ध नसतो. अशा वेळी स्थानिक स्तरावर अल्पदरात उच्च दर्जाचे उपचार मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळतो. या घटनेमुळे ग्रामीण भागातही विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.