१०८ वर्षांची पोलिस ठाण्याची ऐतिहासिक वास्तू
माणगावातील दगडी इमारतीच्या संवर्धनाची मागणी
माणगाव, ता. २० (वार्ताहर) : माणगाव शहराच्या मध्यभागी उभी असलेली तहसीलदार कार्यालय व पोलिस ठाण्याची दगडी इमारत आजही इतिहासाची साक्ष देत तितक्याच दिमाखात उभी आहे. १९१८ मध्ये ब्रिटिश सत्ताकाळात उभारण्यात आलेली ही वास्तू तब्बल १०८ वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही तिच्या भक्कम रचनेमुळे विशेष ठरते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ‘न्यू मामलेदार कचेरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीत तहसीलदार कार्यालय व पोलिस ठाणे एकाच छताखाली कार्यरत होते. कालांतराने जागेअभावी तहसीलदार कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली, तरीही जुनी इमारत आजही वापरात आहे. दगडी बांधकाम, मजबूत दरवाजे, सागवान लाकडाचे खांब व अभेद्य कोठडी ही तिची वैशिष्ट्ये असून, आजवर या कोठडीतून एकही कैदी पळून गेला नसल्याची नोंद आहे.
या वास्तूने स्वातंत्र्यलढ्याचे अनेक क्षण अनुभवले असून, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिकांना येथे ठेवण्यात आले होते. परिसरातील पोलिस परेड मैदान व वीर यशवंतराव घाडगे यांचे स्मारक या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित करतात.
चौकट
वारसा जतनाची गरज
अलीकडेच इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली असली तरी, दीर्घकालीन संवर्धनासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. ही वास्तू केवळ प्रशासकीय इमारत नसून ऐतिहासिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी तिचे जतन, देखभाल व संरक्षक दृष्टिकोनातून पुनरुज्जीवन करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
माणगावच्या वैभवशाली इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेल्या या इमारतीचे संरक्षण व्हावे, तिचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा तसेच या अमूल्य वारशाच्या जतनासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
-अरुण पवार, खांदाड, माणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.