ऑनलाइन विवाह संस्थेतील फसवणुकीवर प्रबोधन
‘ऑनलाइन नवरा नको गं बाई’ कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : ऑनलाइन विवाह संस्थांचा वाढता वापर आणि त्यातून समोर येणाऱ्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ऑनलाइन नवरा नको गं बाई’ या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. नेत्रा एंटरप्रायझेसच्या वुई मुक्ता व्यासपीठ आणि स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य चौक परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन्सच्या संचालिका प्रिया काकडे यांनी ऑनलाइन विवाह संस्थांमधील संभाव्य धोके, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचावाचे उपाय याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. खोट्या प्रोफाइलच्या माध्यमातून महिलांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक प्रकरणांत भावनिक विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक किंवा गंभीर गुन्ह्यांकडे वाटचाल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विवाहबाह्य संबंध, घटस्फोटासाठी आवश्यक पुरावे संकलन तसेच सोशल मीडियामुळे वाढणारा दुरावा या विषयांवरही त्यांनी भाष्य केले. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील अनेक प्रोफाइल बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महिलांनी सतर्क राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमात ‘नववधू रॅम्प वॉक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन
विविध राज्यांतील पारंपरिक वेशभूषांमध्ये सहभागी तरुणींनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करीत सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडविले. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, केरळ इत्यादी राज्यांतील विवाह परंपरांचे दर्शन या उपक्रमातून घडले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. सहभागी स्पर्धकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘वुई मुक्ता’च्या संस्थापक नेत्रा गुजराथी यांनी अशा उपक्रमांद्वारे महिलांमध्ये सजगता निर्माण करणे हा उद्देश असल्याचे सांगितले. ऑनलाइन माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, विवाह संस्थेतील नव्या प्रकारच्या फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.