बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : शहराच्या पश्चिमेतील मोहनानंदनगर परिसरातील पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात साचलेल्या कचऱ्याने प्रशासनाच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. प्लॅस्टिक, घनकचरा आणि विविध प्रकारची घाण नाल्यात मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली आहे. त्यामुळे जणू संपूर्ण प्रभागाचा कचरा येथेच जमा केला जातो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. वाढलेल्या वनस्पती आणि साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्याचा प्रवाह अरुंद झाला असून, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणीच कचऱ्याला आग लावण्यात येत असल्याने स्वच्छतेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बदलापूर पूर्वेकडून हा नाला पश्चिमेकडे वाहत जाऊन पुढे उल्हास नदीला मिळतो. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास याच नाल्याचे पाणी परिसरात शिरते, हे अनेकदा अनुभवास आले आहे. तरीदेखील नाल्याची नियमित साफसफाई, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी या बाबतीत प्रशासनाची हलगर्जी स्पष्ट दिसून येते. शहरात वाढणारी लोकसंख्या, त्यानुसार वाढणारा महसूल आणि २०२२च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात मिळालेला राज्यातील दुसरा क्रमांक, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्याची ही अस्वच्छ परिस्थिती अधिकच खटकणारी आहे. अंतर्गत रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग, बाजारपेठेतील घाण आणि नाल्यांतील साचलेला कचरा यामुळे बदलापूरची प्रतिमा मलिन होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
या ठिकाणी काही व्यक्तींनी नाल्यातील कचऱ्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. आग लागल्यानंतरही आरोग्य विभागाकडून तत्काळ कोणतीही हालचाल दिसून आली नाही. योगायोगाने याच मार्गाने जात असलेल्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्याची कार्यवाही केली. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, स्वच्छतेचे फक्त फलक, प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे साम्राज्य अशी खोचक टीका नागरिकांकडून केली जात आहे.
मोहनानंदनगर येथील नाल्यात साचलेल्या कचऱ्याबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. त्या ठिकाणी पोकलेन व जेसीबी यंत्रणा पाठवून साचलेला कचरा हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच शहरातील ज्या ठिकाणी कचरा साचतो, अशा सर्व भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित नाल्याची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही नाल्यात कचरा टाकू नये, यासाठी जनजागृतीसह कारवाई करण्यात येणार आहे.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.