उन्हाच्या वाढत्या झळांनी मैदाने ओस!
कुलर-एसीसमोर कॅरम, बुद्धिबळ; मैदानी खेळांना फटका
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः एप्रिल महिन्यापासूनच मुंबईत उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील मैदानावरची खेळाडूंची वर्दळ एकदम कमी झाल्याचे चित्र आहे. मैदानी खेळाऐवजी इनडोअर आणि मोबाईल खेळाकडे विद्यार्थी वळल्याचे दिसून येते.
सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे लहान मुले आणि तरुण मोठ्या प्रमाणात मैदानी खेळांकडे वळतात. मुंबईला खेळांची पंढरी मानली जाते. क्रिकेटसह अनेक खेळांमध्ये शहराची ओळख आहे. त्यामुळे सराव आणि मॅचेससाठी मुंबईतील मर्यादित असलेल्या मैदानांवर खेळाडू अवलंबून आहेत. सामान्यतः शनिवारी, रविवारी मैदाने गर्दीने फुललेली असतात. अनेकदा पाय ठेवायलाही जागा राहत नाही; मात्र मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळे मुले घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे मैदानातील गर्दी रोडावली आहे; मात्र सध्या वाढलेल्या तापमानामुळे ही मैदाने ओस पडलेली दिसत आहेत. दुपारी वाढलेल्या तापमानामुळे खेळाडू मैदानी खेळांऐवजी कुलर, फॅन किंवा एसीच्या वाऱ्याखाली मोबाईल गेम्स, टीव्ही, कॉम्प्युटरवरील ऑनलाइन गेमिंग, बुद्धिबळ, कॅरम यांसारखे बैठे खेळ खेळण्यास पसंती देत आहेत. क्रिकेट सामनेदेखील उशिरा संध्याकाळी खेळवले जात आहेत. तापमानात घट झाल्यानंतर पुन्हा मैदानांवर गर्दी वाढेल, अशी आशा आहे.
उष्माघाताची काळजी घ्या!
तापमानवाढीमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे आहारात हलके, पचायला सोपे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ घ्यावेत. शक्य असल्यास खेळाची वेळ कमी ठेवणे, मध्ये ब्रेक घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ किंवा अतिशय थकवा जाणवणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. त्यामुळे लगेच खेळ थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
वाढत्या तापमानामुळे मैदानी खेळाचे आमचे नियोजन विस्कळित झाले असून घरात टीव्ही पाहत वेळ काढावा लागत आहे.
- श्रावणी जाधव, खेळाडू
वाढत्या उन्हामुळे मैदानी खेळ खेळणे जीवावर बेतण्यासारखे झाले. दुपारी विश्रांती घेऊन संध्याकाळी खेळण्यास प्राधान्य देत आहोत.
- अधीश धोत्रे, विद्यार्थी
सायंकाळी ४ वाजेपर्यंत सूर्याची तीव्रता सर्वाधिक असते, त्यामुळे या वेळेत मैदानी खेळ टाळणे गरजेचे आहे. खेळताना शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी नियमितपणे पाणी, लिंबूपाणी, ताक किंवा नारळपाणी घेत राहावे.
- डॉ. ऋषिकेश देसाई, एमडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.