विचारेवाडीत भीषण पाणीटंचाई
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त
खालापूर, ता. २२ (बातमीदार) ः ऐन उन्हाळ्यात खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायत हद्दीतील विचारेवाडी येथे पाणीटंचाई निरमाण झाली आहे. वाडीतील विहीर कोरडी पडली असून, दुसरीकडे पर्यायी जलवाहिनी फुटल्याने येथील २५ कुटुंबांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आटलेली विहीर आणि फुटलेली जलवाहिनी यामुळे विचारेवाडी ग्रामस्थांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नडोदे ग्रामपंचायतीतील विचारेवाडी दैनंदिन पाण्यासाठी विहिरीवर असलेल्या योजनेवर अवलंबून आहे. विहिर उन्हाळ्यात आटल्यानंतर पाताळगंगा नदीवर ग्रामपंचायतच्या जलजीवन पेयजल योजनेवर ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. परंतु, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विहिरीने तळ गाठला असून, या विहिरीवर आधारित पेयजल योजना सध्या बंद पडली आहे. तर, पाताळगंगा नदीवरील जलजीवन या योजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणी वाडीपर्यंत पोहोचत नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्जाद्वारे ग्रामपंचायतीला तात्पुरती पाणी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे. परंतु, त्याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने पाहत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. यामुळे पाणीसमस्या घेऊन ग्रामस्थ गटविकास अधिकारी खालापूर यांना निवेदन देणार आहेत.
विचारे वाडी ग्रामपंचायत नडोदे हद्दीत आहे की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. रस्ता, पाणी सारख्या मूलभूत सुविधा देखील ग्रामस्थांना मिळत नाही. सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना विचारेवाडी ग्रामस्थांना करावा लागत असून महिलांची पाण्यासाठी फरपट होत आहे.
- दिपक पालकर, विचारेवाडी ग्रामस्थ
विहिरीवरची योजना ग्रामस्थ चालवतात. तर जलजीवन योजनेची जलवाहिनी फुटली ते माहिती नाही. याबाबत सरपंचाकडून माहिती घेऊ.
- ईश्वर पवार, ग्रामपंचायत अधिकारी नडोदे, ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.