...तर रास्ता रोको आंदोलन
एक महिन्यात नेटवर्क न मिळाल्यास कष्टकरी संघटनेचा इशारा
कासा, ता. २३ (बातमीदार) : गुरुवारी (ता. २३) सायवन परिसरात कष्टकरी संघटना व स्थानिक प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत ब्रायन लोबो यांनी सरकारने दुर्गम भागात माहिती व दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तत्काळ पार पाडावी, अशी मागणी केली आहे. तसेच, येत्या एका महिन्याच्या आत नेटवर्क समस्येचे निराकरण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या वेळी कष्टकरी संघटनेच्या वतीने स्थानिक प्रतिनिधी यांना देण्यात आला.
स्थानिकांच्या मते, कागदोपत्री नेटवर्क उपलब्ध असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात सेवा अत्यंत मर्यादित आणि अनियमित आहे. परिणामी शासकीय सेवा, ऑनलाइन शिक्षण तसेच दैनंदिन कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. बंधघर येथे उभारण्यात आलेले शासकीय कार्यालयदेखील नेटवर्कअभावी पूर्ण क्षमतेने कार्यरत नसून तलाठींना कासा येथून कामकाज करावे लागते. याशिवाय आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांना ऑनलाइन काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणही विस्कळित होत असून, काही ठिकाणी नागरिकांना साधा मोबाईल सिग्नल मिळवण्यासाठी उंच टेकड्यांवर जावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या बैठकीत शेणसरी येथील अपूर्ण मोबाईल टॉवर तातडीने सुरू करण्यात यावा, तसेच नेटवर्क सुविधा सुरळीत होईपर्यंत ऑनलाइन प्रक्रियेची सक्ती कमी करावी, अशा मागण्याही मांडण्यात आल्या. या बैठकीस ब्रायन लोबो, मधुबाई धोडी, सायवनचे सरपंच विष्णु बोरसा, चळणीच्या सरपंच सरिता भोये, शेणसरीच्या सरपंच साधना बोरसा, पंचायत समिती डहाणूचे विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, तसेच मोहन चौधरी, त्रिंबक साठे, सुनील मलाकर, रघुनाथ सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------
सुविधांचा अभाव
पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात मोबाईल व इंटरनेट सेवांचा अभाव गंभीर स्वरूप धारण करत असून, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात अनेक विविध प्रकल्पांची कामे सुरू झाली असली तरी दुर्गम भागात मात्र सुविधांची कमतरता भासत आहे. डहाणू, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये आजही समाधानकारक नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.