खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांची अरेरावी
बोईसर (वार्ताहर) : ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगतच्या खाद्यपदार्थ विक्रीच्या वाहनांमुळे एका महिलेचा अपघात झाला होता. या प्रकारानंतर विनापरवाना वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे. बोईसर परिसरात खाद्यपदार्थांच्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची जागा व्यापली जात आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्या रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीसाठी अरुंद जागा असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अशा वाहनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.