पशुपालकांवर भटकंतीची वेळ
कडक उन्हामुळे पाणीटंचाई; गाई-गुरांसाठी वणवण
कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची तीव्र समस्या आहे. अशातच कालव्याच्या दुरुस्तीमुळे सिंचनासाठी पाणी सोडले नसल्याने भूजल पातळी खालावली आहे. परिणामी, गाव-पाड्यांतील पशुपालकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
डहाणू तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरगुती नळयोजना अद्याप पोहोचलेली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नदी-नाले उन्हाच्या तीव्रतेमुळे आटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला ही अवस्था झाल्याने दीड महिना नागरिकांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे पुनर्भरण तसेच पर्यायी पाणी स्रोत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
-----------------------
जनजीवन विस्कळित
पाणीटंचाईचा परिणाम नागरिकांबरोबर पशुधनावरही होत आहे. पूर्वी कालव्यामध्ये पाणी उपलब्ध असल्याने पाणी सहज मिळत होते; मात्र यंदा विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
--------------------------
कासा परिसरात पाणीटंचाईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पशूपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे.
- राकेश शिंदे, प्राणीमित्र