रसायणीत मद्यधुंद कारचालकाची एकाला मारहाण
खालापूर, ता. २४ (बातमीदार) ः मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालक संदीप भगत (वय ४७) यांना जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २३) पहाटे घडली. या प्रकरणी सूरज माळी आणि शुभम माळी यांच्याविरुद्ध रसायणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप भगत हे गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबासह रिक्षाने मुंबई येथे जात होते. वावेघर गावचे हद्दीत आले असता एका चारचाकीने मागून धडक दिली.यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याने भगत यांनी चारचाकी चालक सूरज यांच्याकडे विचारणा केली. यावेळी सूरज यांनी हुज्जत घालून त्यांच्या कानाखाली मारली. सूरज दारुच्या नशेत असल्याचे पाहून भगत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. याचा राग मनात धरून सूरजने रिक्षाचा वायपर तोडून नुकसान केले. तसेच रिक्षाचा वावेघर ते सावळे गावापर्यंत पाठलाग करुन सुरजने मित्र शुभमला बोलावून घेतले. भांडणाचा मनात राग धरुन शिवीगाळ करत संदिप यांना मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे संदीप ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. याबाबत रसायनी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार पान पाटील हे करीत आहेत.