झाडांच्या मोबदल्यावर डल्ला
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप
पालघर, ता. २४ ः वाढवण महामार्गात बाधित होत असलेल्या एका गावामध्ये लहान रोपे मोठी झाडे असल्याचे भासवून अधिकचा मोबदला घेण्यात आला आहे. या प्रकरणात कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरत कटकारस्थान आखल्याची माहिती समोर आली आहे.
वाढवण महामार्गामध्ये डहाणू, पालघर तालुक्यातील २४ गावे बाधित होत आहेत. या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील झाडे, बांधकाम बाधित होणार आहे. त्याचा मोबदला प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. झाडांच्या बाबतीमध्ये अधिकचा मोबदला मिळावा, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना प्रलोभन दाखवून लहान रोपांची लागवड करून घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात रोपे मोठी झाडे असल्याचे भासवून मोबदला मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना फळझाडांच्या अधिक रकमेच्या नोटिसा आलेल्या आहेत. काही ठिकाणी लागवड नसताना त्या ठिकाणी झाडांची लागवड दाखवून मोबदला मिळवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे.
-----------------------
२० टक्के रकमेची मागणी
लहान रोपे मोठी दाखवून त्याचा मोबदला मिळवून देण्याचे प्रलोभन आणि लागवडीखाली नसलेले क्षेत्र लागवडीखालील दाखवून त्याची मोबदला मिळवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी मोबदल्याच्या चक्क २० टक्के रक्कम मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशीची मागणी तक्रारदार विनीत पाटील यांनी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याच्या नोटीस आल्या आहेत. त्या नोटिसा तातडीने रद्द करण्यात याव्यात, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
---------------------
बाधित गावातील एका शेतकऱ्याने एक ते दोन फुटावर ७५ झाडे लावली होती. त्यापैकी २८ झाडांचा मोबदला मिळणार असल्याचे सांगितले गेले. तसेच उर्वरित झाडांसाठी २० टक्के दिले तर पूर्ण मोबदला मिळेल, असे सांगण्यात आले. या प्रकारानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या नोटीस तपासल्या असता ज्यांची झाडे कमी, ज्यांची लागवडच नाही अशा शेतकऱ्यांना ५० ते ६० लाखांपर्यंत मोबदला वाटप होणार असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.
------------------------
तक्रारीचे निवेदन वरिष्ठ कार्यालयातून चौकशीसाठी प्राप्त झाले आहे. तक्रारदारांना अधिकची माहिती देण्यास सांगितले आहे. ती प्राप्त झाल्यावर या प्रकरणात चौकशी केली जाईल.
- विशाल खत्री, उपविभागीय महसूल अधिकारी, डहाणू
फोटो : जागेवर झाडे नसताना झाडांच्या रकमेची नोटीस देण्यात आली आहे.