नवी मुंबईत उंदरांचा वाढता सुळसुळाट
जुन्या कंत्राटदारालाच पुन्हा मुदतवाढ; नगरसेवकांच्या तक्रारींचा पाऊस, तरीही प्रशासनाचा निर्णय कायम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई , ता. २४ : स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत उंदरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उंदरांचा त्रास वाढल्याची तक्रार मांडली. पिंजऱ्यांमध्ये अन्न न ठेवता रिकामे पिंजरे लावले जात असल्याचे प्रकार समोर येत असून, संबंधित कंत्राटदाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिकेने यापूर्वी मुषक नियंत्रणासाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही त्याच कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर केला. अनेक नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध करत नव्याने निविदा काढण्याची मागणी केली. मात्र, चर्चेनंतरही सभागृहाने सर्वानुमते मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केला.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांनी मुषक नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा सल्ला दिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील, असा दावा करण्यात आला.
कंत्राट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उंदरांचा वाढता त्रास आणि त्यावर प्रभावी नियंत्रण न होणे यामुळे महापालिकेच्या कंत्राट व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अपेक्षित परिणाम दिसत नसताना त्याच कंत्राटदाराला पुन्हा संधी देणे ही प्रशासनाची कार्यपद्धती संशयास्पद ठरत आहे. यामुळे केवळ निधीचा अपव्यय होत नाही, तर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे भविष्यात पारदर्शक आणि परिणामकारक निविदा प्रक्रिया राबवून जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे.