किरकोळ वादातून तरुणावर हल्ला
रिक्षाचालकासह तिघांविरोधात गुन्हा
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेतील गांधी चौक परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. रिक्षाचालकासह तिघांनी मिळून तरुणास मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी सोनताटे (वय ३७) हे आपल्या सासऱ्यांसोबत खरेदी करून घरी परतत होते. गांधी चौकातील रिक्षा स्टँडजवळून जात असताना रवी शिंदे नामक रिक्षाचालकाने रिक्षा अतिवेगाने व बेदरकारपणे त्यांच्या अगदी जवळून नेल्यामुळे घाबरलेल्या सोनताटे यांनी चालकाला जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच सोनताटे यांनी आपल्या सासऱ्यांना दुसऱ्या रिक्षातून घरी रवाना केले. मात्र, वाद वाढल्यानंतर रवी शिंदे याने आणखी दोन साथीदारांना बोलावून घेतल्याचा आरोप आहे. तिघांनी मिळून सोनताटे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत सोनताटे यांना तत्काळ बदलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यादरम्यान आरोपींनी “आम्ही गाववाले आहोत, बाहेरून आलेल्यांचा आवाज सहन करणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप सोनताटे यांनी केला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्यामुळे काही रिक्षाचालकांकडून दादागिरी केली जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात घातक शस्त्राने गंभीर दुखापत केल्याप्रकरणी रवी शिंदे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.