आरोग्य केंद्रातच अस्वच्छतेचे साम्राज्य
स्वच्छतागृहासमोर औषधांचा साठा; नागरिकांचा संताप
खारघर, ता. २७ (बातमीदार) : खारघरमधील नागरी आरोग्य केंद्रांमध्ये अस्वच्छता आणि अव्यवस्थेचा गंभीर प्रकार समोर आला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या केंद्रात स्वच्छतागृहाच्या समोरच औषधांचा साठा ठेवल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खारघर सेक्टर १२ येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील आपला दवाखान्यात महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जातात. आरोग्य केंद्र हे स्वच्छ आणि सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे असताना येथे मूलभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहाजवळ औषध ठेवल्याचे दिसून येते. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो तसेच औषधांची गुणवत्तादेखील बाधित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून येते आहे. यासंदर्भात खारघरमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क केला असता, स्वच्छतागृहासमोर औषध ठेवू नये. या प्रकारामुळे आरोग्यसेवांबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो. आम्ही डॉक्टर असल्यामुळे पालिकेच्या विरोधात बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य केंद्रातच अशी अस्वच्छता असेल तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन केंद्रातील स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
रुग्ण बेडचा वापर साहित्यासाठी
सेक्टर १५ येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी असलेल्या बेडवर वैद्यकीय साहित्य आणि इतर सामान अस्ताव्यस्त ठेवलेले दिसून आले. यामुळे रुग्णांना उपचार घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बेडचा उपयोग औषध-गोळ्या आणि दस्तऐवज ठेवण्यासाठी केला जात असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, बेड रुग्ण तपासणीसाठी आहेत की साहित्य ठेवण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
आपला दवाखाना या ठिकाणी स्वच्छतागृहासमोरील दरवाजा कायम बंद करण्याची सूचना केली आहे. तसेच दुसऱ्या केंद्रात स्वच्छता करताना काही मिनिटांसाठी बेडवर औषधे ठेवण्यात आली होती. आरोग्य केंद्र स्वच्छ असावे, यासाठी सूचना केल्या आहेत.
- आनंद गोसावी, मुख्य आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका
--------------------
सेक्टर १५ येथील आरोग्य केंद्रात बेडवर वैद्यकीय साहित्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.