ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : वाढत्या तापमानाला नियंत्रित ठेवण्याकरिता एक-एक झाड महत्त्वाचे असताना ठाणे महापालिकेकडून सुमारे दीडशे वर्षांच्या वृक्षाची कत्तल करण्याचे पाऊल उचलले जात आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या झाडाची तोड होणार असून पर्यावरणप्रेमींकडून त्यास प्रखर विरोध केला जात आहे. हे झाड वाचविण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी महापालिकेला नोटीस पाठवून इशारा दिला आहे. या वृक्षाच्या बाजूला अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून ती हटवण्याऐवजी झाडाची कत्तल करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती परिक्षेत्रातील बाळकूम रोड येथे सुमारे १५० वर्षे जुने वडाचे झाड आहे. रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत हे झाड तोडण्याकरिता ठाणे पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. येथील उच्चभ्रू नागरी वसाहत असलेल्या हायलँड ते हिलस्प्रिंग ते रुणवाल गोल्डन सिटी या रस्ता रुंदीकरण कामी हा वृक्ष बाधित होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. हा वृक्ष या ठिकाणाहून हटवणे अथवा पुनर्रोपण करणे आवश्यक असल्याचे पालिकेला वाटते; मात्र हे कृत्य निसर्गाला हानी पोहोचवणारे आहे. पालिकेने याबाबत बजावलेली भूमिका कायदा पायदळी तुडवणारी असून त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून पर्यावरणाचे रक्षण केले जाईल, अशी नोटीस पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी पालिका आयुक्तांना पाठवली आहे. झाड तोडण्यासाठी पालिकेने चुकीची प्रक्रिया राबवल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.