‘काळी मैना’ बाजारात दाखल
रानमेव्याला मोठी मागणी; महिलांना मिळतोय रोजगार
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : रानातील ‘काळी मैना’ म्हणून ओळखली जाणारी काळीभोर, गोड करवंदे सध्या विक्रमगड परिसरातील बाजारपेठांमध्ये दाखल झाली असून, ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा मात्र करवंदांचा हंगाम उशिराने सुरू झाल्याचे दिसून येत आहे. नेहमीप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दिसणारी करवंदे यंदा एप्रिल महिना संपल्यानंतर, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बाजारात आली आहेत.
करवंदे विक्री करणाऱ्या महिलांच्या मते, यंदा हवामानातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. विक्रेती लक्ष्मी कोरडा यांनी सांगितले की, पावसाचे लांबलेले आगमन, थंडीचे वाढलेले प्रमाण आणि अवकाळी पावसामुळे करवंदांच्या झाडांना योग्य वेळी फुलोरा आला नाही. परिणामी फलधारणा उशिरा झाली आणि उत्पन्नात घट झाली आहे. करवंदे विकणाऱ्या महिलांसाठी हा व्यवसाय केवळ पूरक नव्हे, तर मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे. पळसाच्या पानात सजवून विकली जाणारी करवंदे ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरतात. मात्र, या मागे महिलांची प्रचंड मेहनत दडलेली आहे. रणरणत्या उन्हात डोंगर-दऱ्यांत, जंगलात जाऊन काटेरी झुडपांतून करवंदे शोधावी लागतात. अनेकदा काट्यांचे फटके सहन करत, तासन्तास कष्ट करून त्या टोपलीभर करवंदे गोळा करतात.
----------
रक्तशुद्धीसाठी फायदेशीर
बाजारात करवंदांचा एक वाटा १० ते २० रुपयांना विकला जात असून, दिवसाला साधारण चारशे ते पाचशे रुपयांची विक्री होते. या उत्पन्नातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. ‘पहाटे घराबाहेर पडतो आणि रानात फिरत राहतो; किती लांब आलो हेही कळत नाही,’ असे या महिला सांगतात. करवंदे ही केवळ चविष्ट फळे नसून आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानली जातात. विशेषतः रक्तशुद्धीसाठी ती फायदेशीर असल्याचे मानले जाते. त्यामुळे ग्राहकांकडून या फळांना चांगली मागणी आहे.
-----------
ग्राहकांची पसंती
सध्या विक्रमगडच्या बाजारात करवंदांसोबत, आंबे इतर रानमेवा आणि विविध रानभाज्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. रानमेवा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्याने त्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे गल्ली-बोळ, नाके आणि बाजारपेठांमध्ये या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत, निसर्गाच्या बदलत्या चक्राचा परिणाम रानमेव्यावर होत असला तरी, त्यातून महिलांना मिळणारा रोजगार आणि ग्राहकांकडून मिळणारी पसंती ही बाब महत्त्वाची ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.