लग्नसोहळ्यातून एकोप्याचे दर्शन
जात्यावर हळद दळण्याची परंपरा कायम
जव्हार, ता. ४ (बातमीदार)ः डिजिटल युगात सोशल मीडियाच्या युगात गिरण्यांची जागा यंत्रांनी घेतली आहे, पण जव्हारसारख्या ग्रामीण भागात लग्नसराईत धान्य दळणे असो किंवा लग्नाची हळद दळण्यासाठी आजही पारंपरिक जात्यालाच प्राधान्य दिले जात आहे.
लग्नसोहळ्याला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. ग्रामीण भागात लग्नानिमित्त होणाऱ्या हळदीला विशेष महत्त्व आहे. आजही ग्रामीण भागात विवाह समारंभातील हळद दळण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. जात्यावर दळलेली हळद शुभ मानली जाते. महिला पारंपरिक ओव्या गातात. ज्यामुळे वातावरणात आनंद, उत्साह निर्माण होतो. जातं हे धान्य दळण्याचे साधन नसून संस्कृती, परंपरा, प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लग्न कार्यातील हळद जात्यावर दळण्याची परंपरा आजही कायम आहे.
----------------------
पारंपरिक ओव्यांचे आकर्षण
‘फिरतंय जातं, घुमतंय गाणं, आईच्या हाती, उडदाचे दाणं...’ अशा ओव्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. नव्या पिढीला या परंपरेची ओळख कमी होत असली, तरी ज्येष्ठ महिला आजही ओव्यांमधून संस्कृती जिवंत ठेवत आहेत. तर ‘पडती डाळी, सोन्यावाणी पिवळी, कष्टाची भाकर, गोड लागे ती काळी...’, या ओळींमधून आईच्या कष्टांची जाणीव होते.
----------------------
लग्न ठरल्यावर वधू किंवा वराच्या घरी गावातील महिला, शेजारीणबाई, नातेवाईक एकत्र जमतात. जात्यावर हळद दळताना पारंपरिक ओव्या, लग्नगीते गायली जातात. या प्रक्रियेत केवळ हळद तयार होत नाही, तर नातेसंबंध अधिक दृढ होतात.
-वैदेही वाढान, माजी जी. प. अध्यक्ष
---------------------
हळद दळण्याचा कार्यक्रम महिलांसाठी एक सामाजिक व्यासपीठ ठरतो. कामाच्या गडबडीतही एकत्र येऊन हसणं, गप्पा मारणे, अनुभवांची देवाणघेवाणीतून मानसिक समाधान मिळते.
- गुलाब राऊत, माजी सभापती
-----------------
आजच्या धकाधकीच्या, यांत्रिक जीवनात ग्रामीण भागात अशी परंपरा जपली जात आहे, ही बाब प्रेरणादायी आहे. जात्यावर दळलेली हळद केवळ एक विधी नसून, एकोपा, संस्कृतीचे प्रतीक आहे.
- विशाखा अहिरे, माजी सभापती