एसी लोकलविरुद्ध विरारमध्ये उद्रेक
प्रवासी रुळावर उतरल्याने सेवा विस्कळित
विरार, ता. ४ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेला प्रवाशांच्या राेषाला सामाेरे जावे लागले. सकाळी ८.२८ची विरार-चर्चगेट ही साधी लोकल वातानुकूलित (एसी) करण्यात आल्याने साेमवारी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. जाेरदार घाेषणाबाजीसह शेकडाे प्रवाशांनी अचानक रुळांवर उतरून गाडी अडवल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत प्रचंड गदाराेळ उडून रेल्वेसेवा विस्कळित झाली. यामुळे विरारसह नालासोपारा, वसई आणि भाईंदर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
पश्चिम रेल्वेने १ मेपासून १२ एसी लोकल फेऱ्या वाढवल्या आहेत. आधीच या वेळेत एसी लोकल सुरू असताना काही मिनिटांच्या अंतराने आणखी फेरी सुरू करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विरारहून सकाळची ८:२८ची लोकल नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची होती. ही गाडी रद्द करून एसी लाेकल सुरू केल्यामुळे इतर गाड्यांवरील गर्दी वाढली आहे. सकाळी ८:३३ वाजता एसी लोकल सुरू असताना नव्याने एसी लाेकल सुरू करण्याची गरज काय, असा सवाल प्रवासी करत आहेत. एसी लोकलचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सर्वसामान्यांचे वेळापत्रक बिघडले हाेते.
‘आमचा एसी गाड्यांना विरोध नाही; मात्र त्या स्वतंत्रपणे सुरू कराव्यात. नियमित लोकलचे एसीमध्ये रूपांतर करून सर्वसामान्यांच्या प्रवासावर परिणाम करू नये,’ अशी भूमिका आंदोलक प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रवाशांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून सामान्य लोकल फेऱ्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.
१० ते १५ मिनिटे विलंब
आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांचे वेळापत्रक काेलमडले हाेते. काही गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिस्थिती चिघळू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. रेल्वे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची समजूत काढल्यानंतर आंदाेलन शांत झाले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.