पनवेल, ता. १० (बातमीदार) : रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव कळंबोली पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने प्रसंगावधान राखत धाडसाने वाचविला. पोलिस शिपाई सागर माळी आणि आकाश वानखेडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून महिलेला सुखरूप बाहेर काढले.
मानसिक तणावाखाली आलेल्या कळंबोलीतील एका ३५ वर्षीय महिलेने रविवारी (ता. १०) दुपारी १२:३० च्या सुमारास रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात उडी मारली होती. याबाबतची माहिती एका जागरूक नागरिकाने कंट्रोल रूमला कळवली. त्यानंतर कळंबोली पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल १ ला तातडीने याबाबतची माहिती देण्यात आली. बीट मार्शलवरील पोलिस शिपाई सागर माळी आणि आकाश वानखेडे यांनी अवघ्या तीन मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिला तलावात बुडत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सागर माळी यांनी कोणतीही भीती न बाळगता तत्काळ गणवेशातच तलावात उडी घेतली आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने आशा हॉस्पिटल येथे पोलिस वाहनातून उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असून, पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला एमजीएम हॉस्पिटल येथे पोलिस वाहनातून रवाना करण्यात आले.
संबंधित महिला ही मानसिकरीत्या काहीशी आजारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले. या घटनेत बचावलेल्या महिलेला सागर माळी आणि आकाश वानखेडे या पोलिसांची वेळेत मदत मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. दोघांच्या या धाडसी कामगिरीचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.