सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी सॅटिस (स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना) प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा ठरलेली ‘ऑप्टिक्स’ इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सॅटिस पुलाच्या कामाला वेग मिळणार आहे. प्रशासनाने आता ३० जूनपर्यंत पुलाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाढती कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने सरकारी निधीतून सॅटिस प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाअंतर्गत पश्चिमेकडील वल्लीपीर रोडवरील बैलबाजार चौक ते मुरबाड रोडवरील सुभाष चौकापर्यंत सुमारे १२०० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर शहरातील आणि बाहेरून येणारी वाहने थेट पुलावरून मार्गक्रमण करू शकतील. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील कोंडीत मोठी घट होणार आहे.
या पुलाच्या मार्गात असलेल्या ‘ऑप्टिक्स’ इमारतीमुळे कामाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने महापालिकेला कोणतीही कारवाई करता येत नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील महत्त्वाची कामे अनेक वर्षे रखडली होती. अखेर न्यायालयीन प्रक्रियेनंतर इमारत हटविण्याचा मार्ग मोकळा झाला.
महापालिकेच्या ज्येष्ठ कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनीही प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनीही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या सॅटिस प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याने कल्याणकरांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
धुळीचा त्रास कमी होण्यासाठी योजना
न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महापालिकेने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ‘ऑप्टिक्स’ इमारत पाडण्याची कारवाई केली. परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी अग्निशमन विभागाकडून चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. ही इमारत हटवल्यानंतर या भागातील इतर चार अडथळेही आपोआप दूर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
३० जूनपर्यंत पुलाचा पहिला टप्पा
रोहिणी लोकरे म्हणाल्या की, सॅटिस पुलाच्या मार्गातील इमारतीचा अडथळा दूर करण्यात आला आहे. आता या भागातील उर्वरित कामे तातडीने हाती घेण्यात येत असून, ३० जूनपर्यंत पुलाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.