टाटा हॉस्पिटलबाहेर गरजूंसाठी अन्नदानाचा उपक्रम
द सोशल आर्किटेक्ट फाउंडेशनचे सेवाभावी कार्य
खारघर, ता. १३ (बातमीदार) : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या शहरात दाखल होणाऱ्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः वेळेवर आणि परवडणारे जेवण मिळणे ही मोठी समस्या ठरते. ही गरज ओळखून खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर द सोशल आर्किटेक्ट फाउंडेशनच्या वतीने दररोज दुपारच्या वेळी गरजू नातेवाइकांना ताजे, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न विनामूल्य देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सेवाभावी कार्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळत असून, समाधान व्यक्त केले जात आहे.
खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात देशातील विविध राज्यांतून कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अनेक रुग्णांचे नातेवाईक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना बाहेर महागडे जेवण घेणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे रुग्णालय परिसरात हॉटेल किंवा खाणावळींची सुविधा नसल्याने नातेवाइकांची मोठी गैरसोय होत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी गेल्या तीन महिन्यांपासून अन्नदानाचा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज दुपारच्या वेळी गरम व ताज्या जेवणाचे वितरण केले जाते. या जेवणामध्ये भाजी, पोळी, भात तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. या उपक्रमात फाउंडेशनचे अनेक स्वयंसेवक सहभागी होत असून, मानवतेचा संदेश देत आहेत. जेवण घेतल्यानंतर अनेक नातेवाइकांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
कोट :
समाजातील गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात हॉटेल किंवा खाणावळ नसल्याने नातेवाइकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्नदान उपक्रम सुरू केला. दररोज जवळपास २०० जणांना मोफत जेवण दिले जात असून, पुढील काळातही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा मानस आहे.
— प्रथमेश बेलोसे, पदाधिकारी, द सोशल आर्किटेक्ट फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.