

maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधेपणाचा संदेश देत मर्यादित वाहन ताफ्यासह दौरे करत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बुलेटवर आगमन करून इंधन बचतीचा संदेश दिला. मात्र त्याच सरकारमधील महिला हक्क व कल्याण समितीच्या दिंडोरी दौऱ्यात मोठ्या वाहन ताफ्याची उपस्थिती पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली समितीने दिंडोरी पंचायत समिती आणि पोलिस ठाण्याला भेट देत महिला सुरक्षा, बालकल्याण योजना, अंगणवाडी सेवा आणि महिला अत्याचारासंदर्भातील कामांचा आढावा घेतला. मात्र दौऱ्याचा मुख्य चर्चेचा विषय हा वाहनांचा मोठा ताफाच ठरला. शासनाकडून खर्चकपात आणि इंधन बचतीचे आवाहन केले जात असताना प्रत्यक्षात मात्र अशा दौऱ्यांमध्ये वाहनांची रेलचेल दिसत असल्याने सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने अनावश्यक दौरे टाळून शक्यतो आभासी माध्यमातून बैठका घेण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्या सूचनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची चर्चा दिंडोरी परिसरात रंगली आहे.