भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडीतील काल्हेर परिसरात दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावत पळ काढला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काल्हेर येथील बांगरनगर परिसरातील ‘रुद्र पार्क’ येथे राहणाऱ्या प्रियांका सिंग (वय ३४) या बुधवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानसागर कॉम्प्लेक्समधील ‘साई सागर अपार्टमेंट’ येथे आईच्या घरी जात होत्या. इमारतीच्या ‘ए’ विंगमधील पहिल्या मजल्याच्या जिन्यावरून जात असताना मागून एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. इमारतीबाहेर त्याचा साथीदार दुचाकीसह थांबलेला होता. दोघेही दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांच्या अंदाजानुसार, मंगळसूत्राची किंमत ९५ हजार रुपये आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.