बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : शहरात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीमागे नैसर्गिक नाले, ओहोळ आणि जलवाहिन्यांवरील वाढती अतिक्रमणे हे प्रमुख कारण असल्याचा गंभीर आरोप ‘नमस्ते बदलापूर’ संघटनेने केला आहे. संघटनेचे अध्यक्ष नाना देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शहरातील विविध भागांतील नैसर्गिक जलमार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याने भविष्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शिरगाव, कात्रप, कवटेवाडी, मोहपाडा, सरस्वतीनगर, बेलवली, चिखलोली तसेच मांजर्ली-वालवली परिसरातील अनेक नैसर्गिक ओहोळ आणि नाले अरुंद करण्यात आले आहे. काही ठिकाणी ते पूर्णपणे बुजविण्यात आले आहेत. डोंगराळ भागातून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने शहरातील पूरस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचा दावा करण्यात आला आहे. बदलापूर हे सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले शहर असून पूर्वी डोंगरातून वाहणारे अनेक झरे, ओहोळ आणि नैसर्गिक नाले शहरातील जलनिचरा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे अनेक नैसर्गिक जलमार्गांवर भराव टाकून रस्ते, इमारती आणि इतर बांधकामे उभारल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचे संघटनेने पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
नाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘नमस्ते बदलापूर’ संघटना अनेक वर्षांपासून या प्रश्नावर पाठपुरावा करत असून प्रशासनाला वारंवार लेखी तक्रारी आणि निवेदने सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रभावी कारवाई न झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
ओहोळांवर मातीचा भराव
कवटेवाडी आणि मोहपाडा परिसरातील ओहोळांवर मातीचा भराव टाकून पाण्याच्या टाक्या, रस्ते आणि इतर बांधकामे उभारले आहेत. तसेच नवीन पनवेल रोडलगत अनेक नाल्यांच्या मोऱ्या बंद केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहण्याचा धोका वाढला आहे. मोहन पाम, सरस्वतीनगर, आमटे गार्डन, बेलवली-अंबरनाथ रोड, नायरा पेट्रोलपंप परिसर, गणेशघाट, अजयराजा हॉल, शनीनगर आणि अंजलीनगर भागांमध्ये नाल्यांवर अतिक्रमणे, भराव व स्लॅब टाकून जलप्रवाह अरुंद केल्याची तक्रार संघटनेने पालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जनआंदोलनाचा इशारा
शहरातील सर्व नैसर्गिक नाले, ओहोळ आणि नदीपात्रांमधील अतिक्रमणे हटवून गाळ, माती व भराव युद्धपातळीवर काढण्यात यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्तहानी होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘नमस्ते बदलापूर’ने प्रशासनाला दिला आहे.
नैसर्गिक नाले आणि जलवाहिन्यांवरील अतिक्रमणांकडे प्रशासनाने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाले असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल.
- नाना देशमुख, अध्यक्ष, नमस्ते बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.