वाणगाव, ता. २३ (बातमीदार) : कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत कार्यरत असलेले जिल्ह्यातील एकमेव स्वयंचलित हवामान केंद्र निधीअभावी मार्च २०२६ पासून बंद पडले असून, त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. हे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून हे केंद्र तालुकानिहाय हवामान, पावसाची स्थिती, वाऱ्याचा वेग, वीज कोसळण्याची शक्यता आणि पिकांबाबत मार्गदर्शन देत होते. ७० व्हॉट्सअॅप समूहांद्वारे पालघरमधील ८५० गावांतील सुमारे ४० हजार शेतकरी या सेवेशी जोडले गेले होते.
शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद आणि दामिनी तांडेल यांनी वेळेवर हवामान माहिती व कृषी सल्ला देऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान टाळले होते. चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेदरम्यान हे केंद्र शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरले होते.
शेतीविषयक निर्णय घेणे कठीण
दर १५ मिनिटांनी हवामान नोंदी घेणाऱ्या या केंद्रामुळे हवामानावर आधारित कृषी नियोजन सुलभ होत होते. मात्र, केंद्र बंद झाल्यानंतर स्थानिक स्तरावरील अचूक हवामान माहिती उपलब्ध होत नसल्याने पेरणी, फवारणी व इतर शेतीविषयक निर्णय घेणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांना केवळ पावसाचा आकडा सांगत नाही, तर त्या बदलत्या हवामानात पीक कसे वाचवायचे याचे तांत्रिक मार्गदर्शन करते. त्यामुळे शासनाने बंद केलेले स्वयंचलित हवामान केंद्र पूर्ववत करावे, जेणेकरून हवामानाचा अंदाज चुकणार नाही.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
स्वयंचलित हवामान केंद्रामुळे वादळ, वारा, पाऊस, आर्द्रता, उष्णता, थंडी आदींबाबत अचूक अंदाज प्राप्त होत होता. शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार पिकांना पाणी देण्याची वेळ, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण याबाबत योग्य निर्णय घेणे शक्य होते; परंतु जिल्ह्यातील हवामान केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
- यज्ञेश सावे, कृषिरत्न, बोरीगाव, तलासरी
वाणगाव : कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत कार्यरत असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बंद अवस्थेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.