उरणच्या मासळी बाजार, स्वच्छतागृहांची दुरवस्था
दुरुस्तीला विरोध होत असल्याचा आरोप
उरण, ता. २३ (बातमीदार) : उरण शहरातील कोट नाका येथील मासळी बाजार आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने मच्छीविक्रेते आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुटलेल्या विद्युत फलक, उघड्या वायर, मोडकळीस आलेल्या पायऱ्या आणि सांडपाण्याचा निचरा न होण्याच्या समस्येमुळे अपघाताचा धोका वाढल्याची बाब उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पाहणीनंतर निदर्शनास आणून दिली.
उरण शहरातील एकमेव मासळी बाजार कोट नाका येथे असून, येथे दररोज अनेक कोळी महिला आपल्या उदरनिर्वाहासाठी मासळी विक्री करतात. तसेच हजारो नागरिक मासळी खरेदीसाठी या बाजारात येतात. मात्र बाजाराची तसेच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने विक्रेते आणि ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
बाजारातील तुटलेले कठडे, मोडकळीस आलेल्या पायऱ्या, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी असलेले नाले तुंबल्याने साचणारे पाणी तसेच स्वच्छतागृहांची जीर्ण अवस्था यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. याशिवाय विद्युत व्यवस्थेसाठी बसविण्यात आलेले बोर्ड आणि वायर तुटलेल्या अवस्थेत असल्याने येथे मासळी विक्री करणाऱ्या महिलांना विजेचा धक्का बसण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्यांकडे प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि त्यांच्या सहकारी नगरसेविकांनी मासळी बाजाराला भेट देऊन विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाजार आणि स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेत ठराव मांडण्यात आला असला, तरी या दुरुस्तीच्या कामांना विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे बाजारातील आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी मच्छी विक्रेत्यांसह नागरिकांकडून होत आहे.
कोट
नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मासळी मार्केटमधील धोकादायक वायरिंग दुरुस्तीचा मुद्दा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. मात्र अत्यंत दुर्दैवाने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाला तीव्र विरोध केला. बाजारातील वायरिंग व्यवस्थित असून कोणत्याही दुरुस्तीची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. परिणामी आजही विक्रेते आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून या बाजारात वावरावे लागत आहे.
भावना घाणेकर, नगराध्यक्षा-उरण नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.